पिंपरी – थेट इंस्टाग्राम या समाज माध्यमावर पिस्टल विक्रीची जाहिरात पोस्ट करणाऱ्या सराईताला गुंडा विरोधी पथकाने गजाआड केले आहे. त्यासोबतच आणखी दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. खंडू अशोक कालेकर (24, रा. काले कॉलनी, पवनानगर, मावळ), अक्षय उर्फ दादा साहेबराव सुर्वे (24, रा. संकुल सोसायटी, भुगाव, मुळशी), शुभम गणेश खडके (विघ्नहर्ता पार्क सोसायटी, मुळशी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेकर हा सराईत गुन्हेगार असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकत असतो. पिंपरी-चिंचवडमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. कालेकर पवनानगर, मावळ येथे राहण्यास असला तरी पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह होता. गुंडा विरोधी पथक सातत्याने सराईतांच्या मागावर असते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर होत असलेल्या पोस्टवरही या पथकाचे लक्ष असते. याच दरम्यान गुंडा विरोधी पथकाला आरोपी कालेकर याने इंस्टाग्रामवर पिस्तूल विक्रीची एक जाहिरात प्रसिद्ध केल्याचे आढळले.
यामध्ये ब्रेटा मॉडेलची एक पिस्तूल आणि त्याखाली 60 हजार रुपये किंमत दाखवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी कालेकर याने विक्रीसाठी मध्यप्रदेश येथून 6 गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली. तसेच, कालेकर हा थेरगाव येथील डांगे चौक परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅक्झिन, नऊ जिवंत काडतुसे जप्त केली.
पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तुषार उर्फ आप्पा गोगावले (रा. नवले ब्रिज, पुणे) याला तीन पिस्तुल आणि बारा काडतुसे विक्री केल्याचे कबुली दिली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली.