सिंहगडरस्ता, दि. 23 (प्रतिनिधी) -ज्येष्ठ नागरिकाची 70 हजारांची रोकड आणि महत्त्वाचे कागदपत्रे असलेली पिशवी भाजी विक्रेत्याकडे विसरली होती. दरम्यान, या व्यापाऱ्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधत संबंधित व्यक्तीला तो ऐवज सुरक्षित पोहचवला. ही घटना वडगाव धायरी येथील फन टाइम सिनेमामागे असलेल्या बाजारपेठेत घडली.
वडगाव भागात श्री साई भाजी भांडार आहे. तेथे रात्रीच्या सुमारास एका ज्येष्ठ व्यक्तीची पिशवी विसरल्याचे दुकानाचे मालक दादासाहेब लाटे यांच्या नजरेस पडले. त्यांनी सिंहगड रोड पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी या गोष्टीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाचा शोध घेत हा ऐवज परत केला. याप्रसंगी दादासाहेब लाटे यांचाही सन्मान करण्यात आला. लाटे यांच्या या कृतीचे या भागात सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, लाटे हे संवेदनशील व्यापारी गेल्या 7 वर्षांपासून या भागात फक्त वीस रुपये किलो दराने सर्वसामान्यांना भाजीपाला उपलब्ध करून देतात.