कार्ला, दि. 15 (वार्ताहर) -अनाम प्रेम परिवाराच्या वतीने खास भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसाठी दिवाळी फराळ पाठविण्यात आला. त्याकरिता पुणे, तळेगाव व लोणावळा परिसरातील तील सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. पोस्टाने पाठविलेला हा फराळ परराज्यातील जवानांना दिवाळी दरम्यान मिळणार आहे. या अनोख्या भेटीने प्राणाची बाजी लावून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांची दिवाळी गोड होणार आहे.
अनाम प्रेम परिवारातर्फे दरवर्षी भारतातील अनेक ठिकाणाहून भारतीय सीमेवरील सैनिकांना दिवाळीच्या वेळेस आपल्या घरातून स्वतः बनवलेला फराळ पाठवला जातो. यावर्षीही भारतीय सैनिकांविषयी असलेले कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आणि स्वतःच्या घरापासून दूर सीमेचे रक्षण करणाऱ्या गुजरात व नागालड येथे तैनात सैनिकांसाठी मिठाई व फराळ तयार करून तो पंधराशे पॅकेटच्या माध्यमातून पाठविण्यात आला.
अनाम प्रेम परिवारातर्फे कार्ला परिसरातील मळवली येथील संपर्क बालग्राम येथे हा सर्व फराळतयार करण्यात आला.अनाम प्रेम हा सर्वांमधील शांती आणि मैत्रीसाठी वचनबद्ध कुटुंबांचा समूह. परमेश्वराच्या नावाने प्रेमाचा शिडकावा करणे आणि प्रत्येक आत्म्याला प्रेमाच्या त्या अदृश्य धाग्याने विणणे हे त्याचे उद्दिष्ट असते. याच उद्देशाने अनेक उपक्रम अनाम प्रेम सदस्य घेत असतात यातील हा एक उपक्रम आहे.
पुणे, तळेगाव व लोणावळा येथील अनाम प्रेम परिवाराचे सदस्य आपल्या परिवारासह तसेच लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कार्ला, भाजे, देवले, पाटण, बोरज या ग्रामीण भागातील महिला बचत गट, लोणावळा कॉलेज व गुरुकुल विद्यालय लोणावळा तसेच संपर्क बालग्राम भाजे या सर्वांचे विशेष सहकार्य या उपक्रमासाठा लाभले.