बारामती – येथील विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी राधिका संजय दराडे हिस सनचेऑन येथे द.कोरियात होणाऱ्या एशियन माऊंटनबाईक चाम्पीयनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. चंदिगड येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेमध्ये राधिकाने प्रथम क्रमांक पटकावला व भारतीय संघामध्ये आपले स्थान निश्चित केले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.
19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण कोरिया येथे होणा-या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत राधिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. राधिकाने आजपर्यंत नऊ राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत यश प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावर चंदीगड येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे.
बारामती परिसरामध्ये दररोज सायकलींगचा सराव करणाऱ्या राधिका दराडेचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले. खासदार सुप्रिया सुळे व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राधिकास तातडीने पासपोर्ट बनवून देण्यास पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांना विनंती केली होती. डॉ. देवरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राधिकास एका तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने पासपोर्ट काढून देऊन खऱ्या अर्थाने तिचा सन्मान केला.
राधिकाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे सचिव ॲड. नीलिमा गुजर, युगेंद्र पवार विश्वस्त सौ सुनेत्रा पवार, मंदार सिकची, डॉ. राजीव शहा किरण गुजर रजिस्ट्रार श्रीश कंबोज प्राचार्य डॉ. भरत शिंदे उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे डॉ. लालासाहेब काशीद प्रा. अंकुश खोत क्रीडा शिक्षक लक्ष्मण मेटकरी. किरण पवार व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी राधिकाचे अभिनंदन केले व आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
दराडे कुटुंबीय सायकलप्रेमी असून राधिकाचे वडील संजय दराडे यांचा सायकल विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. माझ्या यशात माझी आई सुवर्णा दराडे हिचा सिंहाचा वाटा आहे, असे राधिकाने सांगितले. राधिकाने आपले कौशल्य पणाला लावून आज आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकावला. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रतापराव जाधव व प्रशिक्षक बिरु भोजने या दोघांनी राधिकास मार्गदर्शन केले.