Deepak Kesarkar – उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणातील टीकेवर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर आज थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
केसरकर ( Deepak Kesarkar ) म्हणाले की, “मी दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे अस्वस्थ होतो. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही बांधिलकी आहे आणि उद्याही राहील. माझी बांधिलकी ही त्यांच्या चांगल्या विचारसरणीबद्दल आहे. कोणालातरी वाईट बोलणे किंवा डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांना शोभू शकते. असे बोलणे उद्धव ठाकरेंना शोभत नाही.”
केसरकर पुढे म्हणाले की,”उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. तेव्हढाच आदर मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे. शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत, त्यामुळे त्यांच्या अपमान म्हणजे मी माझा अपमान समजतो. कारण कोणत्याही शिवसैनिकाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही.” असेही दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर यावेळी त्यांनी अंधेरीत होणाऱ्या पोटनिवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट सांगितली. केसरकर ( Deepak Kesarkar ) म्हणाले की,” भाजपने आम्हाला एव्हढे मोठे मुख्यमंत्री पद दिले, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे एका आमदारकीसाठी हट्ट करणार नाहीत. भाजप आणि आमची युती असल्याने अशा गोष्टी योग्य नाहीत.” असेही केसरकर यावेळी म्हणाले.