नवी दिल्ली – बीसीसीआय कार्यकारिणीची 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली निवडणूक लढवणार नाही. तसेच मंडळाचे सचिव जय शहा हेही नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. यामुळे 1983च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्यांपैकी एक रॉजर बिन्नी आणि कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. तसेच सौरव गांगुली राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका दिल्लीत पार पडल्या. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते.
विद्यमान खजिनदार आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण हे त्याच पदासाठी पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. बीसीसीआयच्या एजीएममध्ये कर्नाटक राज्याकडून सचिव संतोष मेनन सहभागी होत होते.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे रोहन जेटली, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे संजय बेहरा, हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे अनिरुद्ध चौधरी यांच्या नावांची अन्य पदांसाठी चर्चा होती. सध्याचे सहसचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हेही पुढील निवडणूक लढवणार नाहीत.
दरम्यान, रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.