मॉस्को – रशियाच्या इझेवस्क शहरात एका शाळेत करण्यात आलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन शिक्षक, शाळेचे दोन सुरक्षा रक्षक आणि 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रशियातील तपास संस्थकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच हल्लेखोराने गोळीबारानंतर आत्महत्या केल्याचेही यात सांगण्यात आले.
हल्लेखोराने ब्लॅक टॉप घातला होता व त्यावर नाझींचे चिन्ह होते. त्याच्या कपड्यांवर कोणतेही ओळखपत्र नव्हते. सध्या तो नेमका कोण होता याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे तसेच हल्ल्यामागील कारणाचाही शोध घेतला जातो आहे. या हल्ल्यात किमान 20 जण जखमी झाले असल्याची माहितीही रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, शाळेबाहेर माध्यमांशी बोलताना गव्हर्नर ऍलेक्झांडर ब्रेकलॉव म्हणाले की जखमींमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इझेवस्क शहराची लोकसंख्या साडेसह लाख आहे व रशियाच्या उडमर्ट रिपब्लिकची विभागीय राजधानी आहे. मॉस्कोपासून 1 हजार किमी अंतरावर हे शहर आहे.