मुंबई – चलन बाजारात आज भारतीय रूपया पुन्हा एका नव्या विक्रमी पातळीवर गडगडला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांमधील सावधगिरीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 43 पैशांनी घसरून 81.52 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचला. गेले काही दिवस काही किरकोळ अपवाद वगळता रूपया सतत घसरत आहे.
शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रूपया 30 पैशानी घसरून डॉलरची किंमत 81 रूपये 9 पैसे इतकी झाली होती. तीही एक नीचांकी पातळी होती. पण आजच्या व्यवहारात त्यापेक्षाही अधिक नीचांकी पातळी गाठली गेली आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर म्हणाले की, भारतीय रुपया पुढील काही काळ कमकुवतच राहण्याची शक्यता आहे कारण गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की अमेरिकेतील फेडरल बॅंक महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आक्रमकपणे वाढ करत राहील.
त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय चलनावर होतच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकही महागाई रोखण्यासाठी व्याज दरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे असेही अय्यर यांनी म्हटले आहे.