सातारा -“एमबीबीएस’च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना प्राथमिक आरोग्य केंद्रात 21 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, परळी आरोग्य केंद्रात प्रशिक्षणासाठी नियुक्ती असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण न करता प्रशिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र परळी केंद्रातील डॉक्टरांनी दिले होते. याबाबत परळी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. व्ही. बनगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी नोटीसा पाठवून या प्रकरणाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. कृष्णा कॉलेजचे प्रतिक श्रीवास्तव व प्रज्ञा अगरवाल या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षणासाठी नियुक्त केले होते. या दोघांनी प्रशिक्षण पूर्ण न करता आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण असल्याचे पत्र दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाबाबत डॉ. बनगर व डॉ. चव्हाण यांना 26 सप्टेंबरला प्रत्यक्षात हजर राहून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. कृष्णा मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. मोहिते यांनाही या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे पत्र डॉ. राधाकिशन पवार यांनी दिले आहे.
विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर राहून प्रशिक्षण झाल्याचे पत्र घेतले. या प्रकरणात शासनाची फसवणूक करणे, खोटे दस्तऐवज तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे खुलासा मागविला असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तुणुकीबाबत कृष्णा मेडिकल महाविद्यालयाला नोटीस पाठविली आहे. असे प्रकार कदापी खपवून घेणार नसून संबिंधतांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. राधाकिशन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी