सातारा – लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे गुरुवारअखेर जिल्ह्यात 37 जनावरांचा मृत्यू झाला असून गुरुवारी एकाच दिवसात दहा जनावरांचा मृत्यू झालो. 67 गावांमधील 540 जनावरे बाधित असून 82 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यात एक लाख 35 हजार 763 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावळी अशा नऊ तालुक्यांतील 67 गावांमध्ये लंपी स्किन आजाराची लागण झाली आहे. गुरुवारअखेर 478 गाई व 62 बैल अशा 540 जनावरांस लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. गुरुवारअखेर 76 गाई व 6 बैल अशी 82 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्याकडे 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध आहेत. गुरुवारअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 1 लाख 11 हजार 928 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 18 हजार 325 असे एकूण 1 लाख 30 हजार 253 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पशुधनांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. अंकुश परिहार व डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्किन हा चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व जनावरांचे मोफत लसीकरण
लंपी स्किनच्या उपचारासाठी सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील एकूण 407 गावातील 1 लाख 35 हजार 763 पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुधनास मोफत लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.