नवी दिल्ली : केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाचे नशीब एका रात्रीत पालटले आहे. कारण एका रात्रीत तो चक्क करोडपती झाला आहे. ओनम सणामध्ये ओनम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस लागल्याने त्याला चक्क थोडी थोडकी नव्हे तर २५ कोटींची लॉटरी लागली आहे. या रिक्षावाल्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
श्रीवराहमच्या अनुप याला ही लॉटरी लागली आहे. ऑटो रिक्षा चालवून तो आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी तो जाणार होता. त्यासाठी त्याने एक दिवस आधीच तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्याच रात्रीतुन त्याचे नशीब पालटले कारण तो रातोरात करोडपती झाला.
शनिवारी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकिट त्याची पहिली पसंत नव्हते, त्याच तिकिटाने अनुपला छप्परफाड पैसा दिला आहे. ही लॉटरी लागल्यानंतर त्याने मलेशियाला जायची आता गरज उरली नाही, असे सांगितले आहे. पहिले तिकीट त्याला आवडले नव्हते, म्हणून त्याने दुसरे तिकिट खरेदी केले, या दुसऱ्या तिकिटाने त्याला जिंकवले आहे. आता मला कर्ज घेण्याची गरज नाही, तसेच मलेशियालाही जायची गरज नाही असे तो म्हणाला.
तो गेल्या 22 वर्षांपासून या लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता. या काळता त्याला आतापर्यंत काहीशे रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये मिळाले होते. “मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिला नाही. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो. माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी तो मेसेज माझ्या पत्नीला दाखविला.” असे तो म्हणाला.
एवढी लॉटरी जिंकली तरी अनुपला शंका होती. ‘मला तरीही शंका होती म्हणून मी लॉटरी विकणाऱ्या महिलेला तिकिटाचा फोटो पाठवला. तिनेही तो बंपर लॉटरीचा क्रमांक असल्याचे सांगितले.’ जिंकलेल्या पैशातून कर भरल्यानंतर अनूपला सुमारे 15 कोटी रुपये मिळतील. तो या पैशातून आपले घर बांधणार आहे आणि त्याच्यावर जे काही कर्ज आहे ते फेडणार आहे, असे अनुप म्हणाला.