बीड : बीड जिल्ह्यात माजलगाव धरणामध्ये बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेत असलेल्या कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानही बुडाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुडालेल्या जवानाचे विजय मोरे असे नाव असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, धरणात बुडालेल्या डॉक्टरचा कालच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, माजलगाव धरणामध्ये डॉक्टर दत्ता फपाळ हे पोहण्यासाठी गेले होते. या दरम्यान ते बुडाले. त्यामुळे डॉक्टर दत्ता फपाळ यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण करण्यात आले होते. या पथकामध्ये बुडालेला जवान विजय मोरे यांचाही समावेश होता. डॉक्टरचा शोध घेत असतानाच विजय मोरे सुद्धा बुडाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शोध घेण्यासाठी ऑक्सिजन लावून आपत्ती व्यवस्थापनातील दोन जवान धरणामध्ये उतरले होते. मात्र, शोध घेत असताना एक जवान वर आले, तर दुसरे जवान वर आलेच नाहीत. त्यामुळे आता विजय मोरे यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.