मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याची चर्चा होत असतानाच अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता बळावल्यानंतर शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. दोन दिवसापासून यामुळे निर्देशांक कमी होत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 412 अंकांनी कमी होऊन 59,934 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126 अंकांनी म्हणजे 0.7 टक्क्याने कमी होऊन 17, 877 अंकावर बंद झाला.
टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर मारुती, पावर ग्रीड, एनटीपीसी, लार्सन अँड ट्यूबरो, स्टेट बॅंक या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली, जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान आणि औषधी क्षेत्राच्या कंपन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे निर्देशांक घसरले.
निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराकडून नफेखोरी होत आहे. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य निर्देशांक कमी होत असतानाच मिडकॅप 0.31 टक्क्यांनी तर स्मॉल 0.6 टक्क्यांनी वाढला.
माहिती तंत्रज्ञान, धातू, रिअल्टी, आरोग्य आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक आज कमी झाले तर वाहन आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी 1,397 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेत व्याजदर वाढीची शक्यता असल्यामुळे हे गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. अमेरिकेच्या पतधोरण समितीची बैठक सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे. तोपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना जागतिक मंदीमुळे कच्च्या तेलाचे दर कमी पातळीवर आहेत. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात लाभ होऊ शकतो