वाठार स्टेशन – नांदवळ (ता. कोरेगाव) येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणी सीमा नामदेव चव्हाण (वय ३०) हिला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत वाठार स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदवळ येथील हुपळी या शिवारात वाघोली (ता.कोरेगाव) येथील शैलेश अशोक भोईटे यांची शेत जमीन होती. या शेतात नांदवळ येथील सीमा नामदेव चव्हाण ही मोलमजुरी करण्यासाठी येत होती. दरम्यानच्या काळात शैलेश व सीमा यांच्यात अनैतिक संबंध होते. या संबंधातून अनेकवेळा त्या दोघांत भांडणे होत होती. 19 जुलै २०१७ रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान याच शेतातील शेडमध्ये सीमा हिने शैलेश याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने गळ्यावर व खांद्यावर वार करून शैलेश भोईटे यांचा खून केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैरागकर यांनी करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे यांच्या समोर झाली. सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून मिलिंद ओक यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. परिस्थितीजन्य पुरावा व ११ साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सीमा चव्हाण हिला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास चार महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.