पिंपरी -पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स कंपनी (एचए) कामगारांचे प्रश्न शासन स्तरावर मार्गी लागताना दिसत नाहीत. एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी स्थानिक अध्यक्ष नसल्याने या समस्या निर्माण होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युइटी, कामगारांच्या सुट्ट्यांची देणी प्रलंबितच राहत आहेत.
एचए कंपनीतील कामगारांच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी खासदाराची नियुक्ती केली जाते. ही कंपनी पिंपरी चिंचवडमध्ये असल्याने या पूर्वी पुणे जिल्ह्यातील खासदाराची नियुक्ती केली जात होती. स्थानिक खासदार असल्याने एचएच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींना जाण असल्याची चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे हे संघटनेच्या अध्यक्षपदी होते.
यंदाच्या वेळी पुण्याबाहेरील मुंबईतील भाजपाचे खासदार मनोज कोटक यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शहरात त्यांचा दौरा कमी होत असल्याने शासनस्तरावर एचएचे प्रश्न मांडले जात नसल्याचे चित्र आहे. सध्या निवृत्त कामगारांचे ग्रॅज्युईटी, सुट्यांची देणी अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच कंपनी पुनरुज्जीवनाच्या चर्चांना देखील सध्या ब्रेकच लागला असल्याचे दिसते.रखडलेली अनेक देणी असताना त्याबाबत कामगार कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र त्या बाबत जाहीरपणे कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसते. कंपनी व्यवस्थापनाचा कामगारांवर दबाव असल्याच्या चर्चा आहेत.