भोर – विश्वासघात करून सत्तेवर आलेले सरकार दोन महिने उलटले तरी पालक मंत्री देऊ शकत नाही. यांचे हनीमून अजूनही सुरूच आहे. “50 खोके, सबकुछ ओके..’, अशी बोचरी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी करीत सरकारच्या कार्यप्रणालीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
भोर शहरातील यशवंत मंगल कार्यालयाचे सभागृहात सोमवारी (दि. 22) संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत आढावा बैठक घेण्यात आली त्या वेळी त्या बोलत होत्या. भोर येथे तालुक्यातील जनतेच्या समस्या, विकास कामांची माहिती यांचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत घेतला व विविध खात्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा असा सज्जड शब्दांत आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, भोर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितिन धारणे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील, गटविकास स्नेहा देव, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद साबणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय वागज, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, वनविभागाचे दत्तात्रय मिसाळ, भूमीअभिलेख अधिकारी शिल्पा सानप, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी अधिकारी व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात आरोग्य, रस्ते, वीज, पाणी या मुलभूत समस्यांबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर अनेकांनी ताशेरे ओढले. पशुसंवर्धन व वीज पुरवठ्याबाबत यावेळी नागरिकांनी प्रश्न उपस्थित करुन खासदार सुळेंचे लक्ष वेधले.