प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -भोसरी व मोशी येथे पीएमपीने ई-डेपो उभारण्याचे नियोजन केले खरे; पण भाडेतत्त्वारील या जागा ऐन वेळी जागेची मालकी असलेल्या “पीएमआरडीए’ने काढून घेतल्याने ई-डेपोचे नियोजन बारगळले आहे. त्यामुळे डेपोसाठी पीएमपीला आता पुन्हा जागेच्या पाहणीपासून सुरुवात करावी लागणार आहे.
पीएमपीने ई-डेपोचे नियोजन केलेल्या तीन जागांपैकी वरील दोन जागा पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएच्या) व्यवसायिक दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे सांगत काढून घेतल्या आहेत. तर, तिसऱ्या जागेची देखील मागणी केली आहे. त्यामुळे पीएमपीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपी ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. या दोन्ही शहरांच्या बाजूचा भाग विकसित होत गेल्यानंतर नागरिकांकडून बसची मागणी वाढत गेली. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून पीएमपीने “पीएमआरडीए’च्या हद्दीत तीस ते चाळीस मार्गांवर बससेवा सुरू केली. या मार्गांवर दोनशेहून अधिक बस धावत आहेत.
या दोन्ही शहरांना लागून असलेल्या भोसरी, मोशी आणि रावेत येथील तीन जागा पीएमपीने “पीएमआरडीए’कडून भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्यासाठी “पीएमआरडीए’ला एक कोटी रुपये भाडे देखील दिले होते. मात्र, यातील भोसरी व मोशीतील जागेचे महत्त्व वाढल्यानंतर “पीएमआरडीए’ने त्या पीएमपीकडून परत घेतल्या आहेत. सध्या रावेत येथील जागा पीएमपीच्या ताब्यात असून, तेथे बस डेपो आहे. या डेपोत ठेकेदारांच्या बस उभ्या केल्या जातात.
पीएमपीकडून नऊ जागांची मागणी
“पीएमआरडीए’च्या हद्दीत पीएमपीच्या बस डेपोसाठी जागा आरक्षित करून देण्याची मागणी पीएमपीने केली आहे. त्यानुसार पीएमपीने नऊ मार्गांवर नियोजित डेपो व परिसराची माहिती दिली आहे. या जागा महामार्गालत असाव्यात, किमान पाच एकर क्षेत्र असावे, असे पीएमपीने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. पुणे सोलापूर रस्त्यावर यवत अथवा चौफुला, नगर रस्त्यावर शिक्रापूर, पुणे नाशिक रस्त्यावर राजगुरूनगर, पानशेत रस्तावर डोणजे अथवा खानापूर, सातारा रस्त्यावर कापुरहोळ अथवा नसरापूर, सासवड रस्त्यावर सासवड व जेजुरी दरम्यान, जुना पुणे-मुंबई रस्त्यावर वडगाव मावळ, हिंजवडी रस्त्यावर कासारसाई आणि पौड रस्त्यावर पिरंगुट परिसर येथे जागा द्यावी, असे मागणीत म्हटले आहे.
पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीत जागा आरक्षित करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना रस्त्यानुसार यादी देण्यात आली आहे. या जागा महामार्गालत असाव्यात, असे म्हटले आहे.
– दत्तात्रय झेंडे,
वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी