श्रीगोंदा – ‘टुटू हम ले जायेंगे’ म्हणत त्या हिंदीभाषिक महिलेने श्रीगोंद्यातच ठाण मांडले अन् आपल्या मालकिणीच्या विरहाने सैरभैर झालेला तो पर्शियन बोकाही शुक्रवारी(दि.१९) रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला.
एका हिंदीभाषिक महिलेचा ‘टुटू’ नावाचा बोका शुक्रवारी(दि.१९) दुपारी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला होता. चार तासांच्या शोधमोहिमेनंतरही तो सापडला नव्हता. ‘टुटू’च्या परतीच्या अपेक्षा सोडून त्या महिलेचे सहकारी पुढील कामासाठी रवाना झाले. मात्र बोक्याच्या विरहात आकंठ बुडालेल्या ‘त्या’ महिलेने ‘तुटू हम ले जायेंगे’ अशी भूमिका घेत श्रीगोंद्यातच ठाण मांडले. त्यामागे ‘मेरा टुटू जरूर आयेगा’ अशी त्या महिलेची भावना होती.
अखेर शुक्रवारी(दि.१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला एका पोलीस दादाला ‘टुटू’चे दर्शन झाले. ‘टुटू’ हरवल्याप्रमाणेच ‘टुटू’ सापडल्याची बातमीही वेगाने पसरली. टुटू सापडल्याची बातमी त्या महिलेला सांगण्यात आली. आपल्या ‘टुटू’ ला पाहण्यासाठी आतुर झालेली ती महिला ताबडतोब पोलीस ठाण्यात दाखल झाली अन् अखेर आठ तासांनी त्या महिलेची तिच्या ‘टुटू’शी भेट झाली.
‘टुटू’ हरवला तेव्हा अन् सापडला तेव्हाही दोन्ही वेळेस त्या हिंदीभाषिक महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. मात्र आठ तासांच्या विरहानंतर ‘टुटू’शी झालेल्या भेटीने महिलेच्या आनंदाला उधाण आले होते. एका पर्शियन बोक्याप्रती त्याच्या मालकिणीचे प्रेम पाहून पोलीसदादाही क्षणभर भावुक झाले होते.