मंचर – शिवाजीराव आपण या भागातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आहात मी व्यक्तिशः लक्ष घालून शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी लवकरच विशेष बैठक मंत्रालयात बोलावणार आहे. यासह आपल्या भागातील कामांसाठी राज्य शासनाच्या विविध खात्याच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिली.
प्रमुख ज्योतिर्लिंग असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात येणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भगवान शंकराचे दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब आले असता त्यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कल्पना आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी मंचर ते लांडेवाडी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठीकठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन करून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मार्गस्थ झाले. यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह विविध भागातून शिवसेना पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
“एकच वादा शिवाजी दादा’
लांडेवाडी येथे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी प्रचंड प्रमाणात उपस्थित शिवसैनिकांनी “शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, “एकच वादा शिवाजी दादा’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.