प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -करोनाच्या आपत्कालिन स्थितीनंतरचा हा गणेशोत्सव असल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेवर भर देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेशी संपर्क करून तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करायला हवी.
महापालिकेसोबतच पोलिसांनी देखील तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करावी. पोलिसांकडे दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. उत्सवासाठी त्याच पुणेकरांच्या पैशातून 5 ते 10 कोटी रुपये स्वच्छतेवर पोलिसांनी खर्च करावे, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित “राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019’चा पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, मोहन जोशी, रवींद्र माळवदकर, वर्षा तापकीर, ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, कुमार वांबुरे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
मंडळांचे जाहिरातींवर उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे बॉक्स कमानी आणि इतर बाबतीत आम्ही निश्चितच सहकार्य करू. कोणालाही त्रास देणे हे पोलिसांचे धोरण नाही. आम्ही तुमचे सेवक आहोत. गणेशोत्सव ही पोलीसांसाठी अग्निपरीक्षा असते, आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू, असे गुप्ता यांनी नमूद केले.
सध्या वर्गणी मिळणे, ही मंडळांसाठी अडचण झाली आहे. जाहिरातीच्या उत्पन्नावर उत्सव साजरा होतो. त्यामुळे बॉक्स कमानी आणि जाहिरातींविषयी सवलत द्यावी, असे जोशी म्हणाले. गणेश विसर्जनाच्या दिवशी सगळे रस्ते बंद केले जातात. परंतु काही मार्ग मोकळे ठेवणे गरजेचे आहे. छोट्या गल्ल्या बंद करू नका, अशी विनंती काकडे यांनी केली.
मंडळांना मांडवाची, पोलिसांची आणि एमएसईबीची परवानगी घ्यावी लागते. त्या परवानग्या सुटसुटीतपणे आणि लवकर मिळाव्या, अशी अपेक्षा रासने यांनी व्यक्त केली.