प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना शहरातील खासगी रुग्णालयात चांगल्या दर्जाचे उपचार घेता यावेत, यासाठी महापालिकेकडून एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय साह्य योजना राबविण्यात येते.
या योजनेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, आता सभासदांना कागदी कार्ड ऐवजी स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. हे स्मार्ट कार्ड आणि लाभार्थींचे आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या काही दिवसांत अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन इथापे यावेळी उपस्थित होते.