प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -हिरवीगार वनराई…पावसाची रिमझिम…धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्यांच्या छायेत निसर्गाचा अनुभव घेण्यास पर्यटक पसंती देत आहेत. यातच शनिवार (दि. 13), रविवार (दि. 14) स्वातंत्र्यदिन (दि. 15) आणि पारशी नववर्ष दिन (दि. 16) अशा सलग चार सुट्ट्यांमुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचा बेत आखला आहे.
निसर्ग म्हटलं की, सर्वांनाच त्याची ओढ लागते. श्रावणात निसर्ग अधिकच फुलतो. सर्वत्र असलेले हिरवेगार दृश्य, रिमझिम पडणारा पाऊस या सर्वांचा आनंद घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. सलग जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाचे नियोजन आधी एक महिने तयार होते. त्यानुसार सुट्ट्यांतील “एमटीडीसी’च्या रिसॉर्टचे बुकिंग मागील एक महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले आहे. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे.
शहरातील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास नागरिक पसंती देत आहेत. माळशेज, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणांबरोबरच कोकणात जाण्याकडे जास्त कल वाढत आहे. याचमुळे “एमटीडीसी’च्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, माळशेज, माथेरान येथील बुकिंग फुल्ल झाले आहे.
पावसाचा आनंद घेण्यासाठी काहींनी माळशेज, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर गड किल्ल्यीों हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे. काहींनी देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले आहे.
एमटीडीसीचे रिसॉर्ट जरी फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाठी ही सुविधा निर्माण केली आहे. निवास न्याहारीची व्यवस्था कोठे आहे, याबाबतची माहिती “एमटीडीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातही फुलला निसर्ग
जिल्ह्यातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, भोर आणि वेल्हा येथील धबधबे, धरणे निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी या तालुक्यांतील पर्यटनस्थळाकडे जाण्याचा नागरिकांचा कल आहे.