नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेने सर्वच यंत्रणा कोलमडून पडत आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्या NTAGI या समितीच्या शिफारसीनंतर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. या निर्णयाला आता अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आला आहे. अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे. तसेच भारतात आता शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “जर आपण अडचणीत असाल, जसा भारत आता आहे, त्या परिस्थितीत शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावं. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याचा निर्णय हा योग्यच आहे.”
Extended gap between 2 doses of Covishield reasonable approach, India must get as many people vaccinated: Fauci
Read @ANI Story | https://t.co/n1uxtIeRqk pic.twitter.com/fNASZsPpnE
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2021
जर आपल्याकडे लसीच उपलब्ध नसतील त्यावेळी आपण या दोन डोसमधील अंतर वाढवू शकतो. त्यामुळे मधल्या काळात मोठ्या लोकसंख्येला लस देता येऊ शकते. पण जर लसी उपलब्ध असतील तर असं करु नये असंही डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितले.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या NTAGI समितीने काही शिफारसी केल्या होत्या. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन ते चार महिन्याचं (12 ते 16 आठवडे) अंतर ठेवण्याची शिफारस सरकारच्या NTAGI समितीने केली होती. तर कोवॅक्सिनसाठी कोणताही बदल नाही. कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचं अंतर असेल. गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणाऱ्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात. कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही NTAGI समितीने केली आहे.