प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -मध्य रेल्वेने सुरू केलेल्या विस्टाडोम कोच डब्यांना प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, गेल्या चार महिन्यांत 31 हजार 821 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामधून रेल्वे प्रशासनाला तीन कोटी 99 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मध्य रेल्वेकडून मुंबई-गोवा मार्ग व मुंबई-पुणे मार्गावरील चार गाड्यांना विस्टाडोम कोच बसविले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरील दऱ्या, खोऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम डबे पहिल्यांदा 2018 मध्ये बसविण्यात आले. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार इतर तीन गाड्यांना विस्टाडोम कोच जोडण्यात आले.
पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही विस्टाडोम
पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही विस्टाडोम कोच बसविण्यात आला असून, ती आज (दि. 10) विस्टाडोम कोचसह धावली. यातील प्रवाशांना उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेता येणार आहे. तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद मिळणार आहे. ही गाडी मंगळवारवगळता दररोज पुण्याहून सकाळी सहा वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबाद येथून दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मंगळवारवगळता दररोज सुटेल. ती पुण्यात रात्री 11 वाजून दहा मिनिटांनी दाखल होईल.
रेल्वेप्रवासी संख्याउत्पन्न
जनशताब्दी एक्स्प्रेस10,8132,23,31,274
डेक्कन एक्स्प्रेस10,60480,64,340
डेक्कन क्वीन9,81290,29,856
प्रगती एक्स्प्रेस59253,7,679