मुंबई – विक्रांत ही युद्धनौका जतन करण्यासाठी गोळा केलेल्या सार्वजनिक निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सोमय्या यांनी विक्रांत नौका जतन करण्याच्या नावाखाली 57 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे जमवून त्याचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या प्रकरणात एका माजी लष्करी अधिकाऱ्यानेच त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॉम्बे पोलिसांनी त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली होती. त्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यातच त्यांना अटक होण्याची शक्यता होती. सोमय्या यांचा मुलगा नील हाही या प्रकरणातील आरोपी आहे. हा निधी राज्यपालांकडे जमा करण्याचे आश्वासन सोमय्या यांनी दिले होते पण त्यांनी हे पैसे तेथे जमा केलेले नाहीत ही बाब माहिती अधिकारातही उघड झाली होती.