मल्हारपेठ – नवारस्ता (ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडून चेअरमन, संस्थापक व व्यवस्थापक यांच्या मालकीच्या चारचाकी, दुचाकी असा 40 लाखांचा मुद्देमाल आज जप्त करुन कारवाई केली.
यातील चेअरमन जयंत देवकर आणि संस्थापक दादासाहेब माथणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळले आहेत. संस्थापक, चेअरमन व व्यवस्थापक हे तिघेही तीन महिन्यांपासून फरारी आहेत.
दरम्यान, उरलेली मालमत्ताही जप्त करणार असल्याचे संकेत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नवारस्ता (ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी घोटाळा प्रकरणी सर्व कागदोपत्री पुरावे तपासातून व सहाय्यक निबंधकांच्या अहवालानुसार संस्थेच्या लेखापरीक्षणात आढळलेल्या तपासावरुन या संस्थेत 17 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी संस्थेच्या संस्थापक, चेअरमन व संचालकासह 14 जणांवर मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत चौकशीनंतर हे प्रकरण कालांतराने सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने यातील संचालक मंडळापैकी संस्थापक, चेअरमन व व्यवस्थापक यांची वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. चेअरमनच्या मालकीच्या 4 चारचाकी व दुचाकी एक असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला आहे. यात एक डंपर, स्कार्पिओ, महिंद्रा इनव्हेंडर आणि कार व दुचाकी या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या. मागच्या दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाईची मोहिम सुरु आहे.