प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा… ए वतन वतन मेरे आबाद रहे तू… हम होंगे कामयाब… अशा देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रो मध्ये बसून सादरीकरण करीत 300 विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली. हर घर तिरंगा… अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय… असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली.
निमित्त होते, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील चार विभागांतील प्रत्येकी 75 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 300 विद्यार्थ्यांकरीता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेट्रो सफरीचे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ व परतीचा प्रवास करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान केले. त्याला शिक्षकांनीही साथ दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. शार्दुल जाधवर म्हणाले, षदेशाच्या विकासात मेट्रोचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील मेट्रोचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना मेट्रोची सफर अनुभविता यावी, याकरीता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.’