वानवडी, दि. 4 (प्रतिनिधी) –पुणे महानगरपालिका सायकल ट्रॅक राखीव असलेल्या सायकल ट्रॅक मार्गावर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांची घुसखोरी होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सायकल ट्रॅक घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फातिमानगर चौक-रामटेकडी दरम्यान सायकल ट्रॅक खासगी वाहनांची घुसखोरी सुरू असल्यामुळे या मार्गात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जलदगतीने प्रवास व्हावा यासाठी सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. परंतु, याचा वापर दुचाकी चालकांसह रिक्षा, टेम्पोवालेही करीत आहेत. फातीमा नगर चौक-रामटेकडी सायकल ट्रॅकवर तर खासगी जुनी वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी पार्किंग म्हणून याचा वापर केला जात आहे.
व्यायामापुरतीच सायकल उरली…
एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पुण्यात 1980 पर्यंत सायकल वापरण्याचे प्रमाण मोठे होते. 2017 नंतर हे प्रमाण घसरू लागले तर आता केवळ व्यायामापुरतीच सायकल उरली आहे. खासगी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचबरोबर सायकलस्वारांना रस्त्यावर असुरक्षित वाटत असल्यामुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.