प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 –महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, नागरिकांना पारदर्शक व तत्परतेने सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदैव प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, दादासाहेब कांबळे उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी देशमुख, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रवीण साळुंके, राजेंद्र कचरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिणी सावंत, तहसीलदार श्रीकांत पाटील, सचिन पाटील, राधिका हावळ-बारटक्के, नायब तहसीलदार संजय खडतरे, संजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, महसूल कर्मचारी प्रभाकर कदम यांच्यासह उत्कृष्ट मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई, पोलीस पाटील आणि कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.