प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -खाद्यतेलाच्या तपासणी मोहिमेला अन्न आणि औषध प्रशासनाने सुरुवात केली असून, एक ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. तीन ऑगस्ट रोजी पुणे विभागाने खाद्यतेलाचे 30, वनस्पती तुपाचे एक आणि “मल्टी सोर्स एडिबल ऑइल'(एमईएसओ) चे तीन असे एकूण 34 नमुने गोळा केले आहेत.
दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनविण्यासाठी खाद्यतेलाचा वापर केला जातो. जनतेला चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन नेहमी सतर्क असून, नियमितपणे तसेच विशेष मोहिमांमधून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत केंद्रातील अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार एक ते 14 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात खाद्यतेलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक आणि नामांकित ब्रॅंडचे देखील खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे.
“एमएसईओ’ची विक्री ऍगमार्क लायसन्स शिवाय करता येत नाही. त्यामुळे केवळ गुणवत्ताच नव्हे, तर या परवान्याची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
नमुने घेऊन कारवाई करणार
पुणे विभागाने गोळा केलेल्या खाद्यतेलांच्या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्यांकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे “एफडीए’च्या पुणे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.