सातारा – खटाव तालुक्यातील विसापूर येथील हणमंत भाऊ निकम (वय 68) व कमल हणमंत निकम (वय 65) या वृद्ध दाम्पत्याचा खून करून पसार झालेल्या सतीश विजय शेवाळे (रा. शनिवार पेठ, सातारा), सखाराम आनंदा मदने (रा. पार्ले, ता. कराड) या दोघांना पुसेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यातील शेवाळे हा मृत दाम्पत्याचा मावस जावई असून त्याच्यावर झालेल्या कर्जाचा डोंगर खाली करण्यासाठी सासूचे दागिने लंपास करण्याच्या हेतूनचे त्याने मित्राच्या मदतीने खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे उपस्थित होते. अजयकुमार बन्सल यांनी दिलेली माहिती अशी, हणमंत निकम व कमल निकम हे दोघेही शुक्रवारी दि. 8 रोजी दैनंदिन कामकाम करत होते. शनिवारी दि. 9 रोजी संपूर्ण दिवसभर निकम दाम्पत्याची कोणतीच हालचाल दिसून आली नाही. निकम यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइक उषा जगन्नाथ सावंत यांनी याप्रकरणातील फिर्यादीला बोलावून हणमंत निकम यांच्या घराच्या दरवाजांना बाहेरून कडी लावल्याचे सांगितले. तसेच घरातील लाईट बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर कमल निकम यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही.
म्हणून त्यांच्या स्नुषा विशाखा किरण निकम यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधून घराचे दरवाजे बंद आहेत, तुमचे सासू- सासरे कोठे गेले आहेत का अशी चौकशी केली. विशाखा निकम यांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांना मोबाइलवर फोन केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही असे सांगून तुम्हीच दरवाजा उघडून सासू- सासरे घरात आहेत का ते पाहा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर निकम यांच्या घराची कडी काढून घरातील लाईट सुरु केली. त्यावेळी कमल निकम जमिनीवर अंथरलेल्या जेनवर पडलेल्या अवस्थेत होत्या. हणमंत निकम हेसुध्दा बेडवर पडलेले दिसले. दोघांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते.
त्यांची कोणतीच हालचाल होत नसल्याने दोघेही मरण पावल्याचे दिसून आले. कमल निकम यांच्या अंगावरील नेहमी असणाऱ्या सोन्यांच्या दागिन्यांपैकी केवळ मंगळसूत्र गळ्यात होते. त्यामुळे हा प्रकार चोरट्यांनी केला असेल असा कयास पोलिसांचा होता. मात्र, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरटे येणे अशक्य असल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी गावातील सीसीटिव्ही कॅमेरे तसेच घटनास्थळावरील मोबाइल लोकेशन घेण्यास सुरूवात केली.
यावेळी पोलिसांना सतीश शेवाळे संशयास्पद वाटू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले. चौकशीवेळी सतीश पोलिसांची दिशाभूल करत असल्याने त्याला खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. लोकांची देणी भागवण्यासाठी निकम दाम्पत्याचा खून करून कमल यांच्या गळ्यातील सोने चोरून ते एका सोनाराला विकल्याची त्याने कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, संतोष सपकाळ, अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनिर मुल्ला, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, रोहित निकम वैभव सावंत यांनी केली.
सोन्याचा हव्यास
यातील मृत कमल निकम यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड असल्याने त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने नेहमी असायचे. तर सतीश याच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने सासूचे सोने विकून कर्जातून मुक्त होण्याचा त्याचा डाव होता. त्यामुळेच त्याने दि. 8 रोजी त्यांच्या घरी जाऊन निकम दाम्पत्याचा खून तोंडावर उशीने दाबून केला अन् कमल यांच्या अंगावरील दागिने एका सोनाराला विकले. मात्र, पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याने त्याचा हा डाव फसला असला तरी मृत कमल यांना आणि संशयित सतीश या दोघानांही सोन्याचा हव्यास नडल्याचे समोर आले आहे.