मेलबर्न – जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएलच्या फ्रॅंचायझींचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून मक्तेदारी करण्याचा सध्याचा ट्रेंड धोकादायक आहे, असे मत दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरसंबंधात आलेल्या बातम्यांनंतर गिलख्रिस्टने हे मत वक्तव्य केले आहे. या मोसमात बिग बॅश लीगमधून डेव्हिड वॉर्नर बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण तो यूएई टी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे. या यूएई लीगमध्ये तीन आयपीएल फ्रॅंचायझींनी गुंतवणूक केली आहे.
गिलख्रिस्ट म्हणाला, यूएईमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे वॉर्नर आणि इतर अनेक मोठे खेळाडू त्या लीगकडे वळू शकतात. यामुळे बिग बॅश लीगचे थेट नुकसान होऊ शकते.
डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही, हे मला माहिती आहे. केवळ वॉर्नरच नव्हे, तर इतर खेळाडूंनाही त्या लीगमध्ये सामील होण्याची चिन्हे कमी आहेत.
आयपीएल फ्रॅंचायझीचा जागतिक स्तरावर वाढलेला दबदबा पाहता इतर लीगची गळचेपी होत असल्याचे गिलख्रिस्टने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लक्ष घालण्याचा सल्लाही त्याने दिला आहे.