कीव :- सोमवारी रशियन-युक्रेन युद्ध सहाव्या महिन्यात प्रवेश करत असताना, युक्रेनियन सैन्याने सांगितले की, त्यांनी 50 रशियन लष्करी दारूगोळा डेपो नष्ट केले आहेत. ते म्हणाले, हे ऑपरेशन अमेरिकेकडून मिळालेल्या हिमारस रॉकेट प्रणालीचा वापर करून करण्यात आले. अमेरिकेने जूनमध्ये ही शस्त्रे युक्रेनला दिली होती.
युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी राष्ट्रीय टीव्हीवर सांगितले की, “अमेरिकेच्या उच्च-गतिशील आर्टिलरी रॉकेट सिस्टम (हिमारस) प्रणालीने चांगली कामगिरी केली आणि रशियाला स्वतःचा बचाव करण्याची संधी दिली नाही.”
सध्या रशियाने यावर भाष्य केलेले नाही. रेझनिकोव्ह म्हणाले की, युक्रेनियन तोफखान्याने (Ukrainian artillery) अनेक पुलांवर अचूक हल्ले केले. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिमारस रॉकेट प्रणाली व्दारे गेल्या आठवड्यात खेरसन प्रदेशात नदीकाठी अनेक हल्ले केले होते. दरम्यान, युक्रेनने एक व्हिडिओ देखील जारी केला ज्यामध्ये रशियन अँटी एअर डिफेन्स S-300 (Russian anti-air defense S-300) ची बॅटरी नष्ट केल्याचा दावा केला आहे. व्हिडिओमध्ये अनेक जळालेले ढिगारे दिसत आहेत. युक्रेनच्या लष्कराच्या फेसबुक पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ही पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची बॅटरी आहे.
या प्रदीर्घ युद्धाची परिस्थिती अशी आहे की, रशियन सैन्य आता युक्रेनच्या जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी S-300 क्षेपणास्त्रे वापरत आहे. सोव्हिएत काळातील S-300 क्षेपणास्त्रे पहिल्यांदा 1979 मध्ये तैनात करण्यात आली होती. ही क्षेपणास्त्रे सोव्हिएत हवाई संरक्षण दलांसाठी हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आली होती. तर युक्रेन अमेरिकेच्या मदतीने त्यांचा नाश करत आहे.
रशियाने वापरलेली S-300 क्षेपणास्त्रे विशेष स्फोटकांनी सुसज्ज होती. ही क्षेपणास्त्रे जिथे जिथे पडली तिथे आजूबाजूचे सर्व काही नष्ट झाले. या क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे आता रशियावरील युद्ध गुन्ह्यांचे आरोप वाढत आहेत.