गुरुग्राम – बेकायदेशीर खाणीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप अधिक्षकाला (डिएसपी) खाण माफियांनी ट्रक खाली चिरडल्याची धक्कादायक घटना आज हरियाणातील नूह जिल्ह्यात घडली. या पोलीस उपअधिक्षकाने थांबण्याचा इशारा केल्यानंतरही डंपर ट्रक थांबला नाही आणि याच ट्रक खाली उप अधिक्षकाला चिरडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरेंद्र सिंह असे या घटनेत मरण पावलेल्या तौरु जिल्ह्याच्या पोलीस उप अधिक्षकाचे नाव आहे. ट्रकची कागदपत्रे तपासण्यासाठी त्यांनी डंपर ट्रकला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र चालकाने डंपर ट्रकचा वेग वाढवला आणि सुरेंद्र सिंह यांना त्याखाली चिरडले. सिंह यांचे सरकारी सुरक्षा रक्षक आणि चालक उडी मारून दूर झाले. मात्र सिंह यांना या डंपर ट्रकने जोरदार ठोकर दिली. सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिंह काही महिन्यातच निवृत्त होणार होते.
तुरु जवळच्या पंचगाव येथील अरवली हिल्स भागातील बेकायदेशीर खाणींवर कारवाई करण्यासाठी सुरेंद्र सिंह या भागामध्ये गेले होते. सकाळी 11.50 वाजता त्यांना दगडांची वाहतूकक करणारा ट्रक दिसल्यावर त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला होता. या ट्रक चालकाच्या अटकेसाठी पोलिसांनी छापे गालायला सुरुवात केली आहे.
2015 पासून मूह येथील बेकायदेशीर खाण उद्योगाबाबत दरवर्षी सुमारे 50 तक्रारी दाखल होत आहेत. बेकायदेशीर खाण उद्योजक आणि पोलिसांच्या संगनमताने या खाणी सर्रास सुरू असतात, असे बोलले जाते आहे.