नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या सीमेजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनबरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारतीय लष्कराने आपल्या जवानांना चिनी भाषेचे ज्ञान देण्यात येणार आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान असलेल्या 3,400 किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील टेहळणी तंत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने जवानांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लष्करातील कनिष्ठ आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मंडारीन भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना या भाषेचे तज्ज्ञ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे आवश्यकता आहे अशा ठिकाणच्या जवानांना या भाषेत प्रविण करण्यात येणार आहे, असे संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी आज सांगितले. लष्कराचे उत्तर, पूर्व आणि मध्य विभागातील भाषा प्रशिक्षण केंद्रांमध्ये मंडारीन भाषेचे अभ्यासक्रम चालू करण्यात आले आहेत.
सध्या मंडारीन भाषेच्या कागदपत्रांच्या अनुवादासाठी भारतीय लष्कराच्यावतीने “आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ वर आधारलेल्या सोल्युशन्सचाही वापर केला जातो. प्रभावी संवादासाठी सीमेवरील जवानांमध्ये मंडारीन भाषेचे कौशल्य असणे गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय लष्कराकडे सध्या सर्व श्रेण्यांमध्ये मंडारीन भाषेतील तज्ज्ञ पुरेशा प्रमाणात आहेत. आता प्रादेशिक लष्करात मंडारीन प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर सीमेवरील संरक्षण सिद्धतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने चिनी भाषेतील कौशल्य वाढवण्याकडे आता लक्ष देण्यात येणार आहे.
डावपेचांच्या पातळीवर चिनी भाषेतील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष ऑपरेशनच्यावेळी विश्लेषण आणि भविष्यातील गरजांच्या दृष्टीनेही हे कौशल्य असलेल्यांची गरज आवश्यक असणार आहे. कॉर्प्स कमांडर पातळीवरील चर्चेच्यावेळी, ध्वज बैठकांच्यावेळी, संयुक्त लष्करी सरावाच्यावेळी आणि सीमेवरील जवानांच्या बैठकीच्यावेळी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दृष्टीकोनाला समजून घेण्यासाठी आणि प्रभावी संवादासाठीही हे कौशल्य अधिक प्रभावी असण्याची गरज निर्माण झाली आहे.
लष्करी जवानांना मंडारीन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय लष्कराने यापूर्वीच राष्ट्रीय रक्षा विद्यापिठ, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात आणि शिव नाडर विद्यापिठाबरोबर सामंजस्य करार केला आहे. याशिवाय पंचमढी येथील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रातील मंडारीन प्रशिक्षक तज्ज्ञांच्या रिक्त जागा भरण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.