जयपूर – उदयपूरमध्ये दुकानदाराची हत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाचे पाकिस्तानमध्ये संबंध असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. दोन मारेकऱ्यांपैकी घौस मोहम्मद हा पाकिस्तानातील दावात ए इस्लामी या संघटनेशी संबंधित आहे आणि तो 2014 मध्ये कराचीला गेला होता, असे राजस्थान पोलिसांनी आज सांगितले.
उदयपूरमधील निर्घृण हत्येशी संबंधित आणखीन तिघाजणांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले असल्याचे पोलीस महासंचालक एम.एल. लाथेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रियाझ अख्तरी आणि घौस मोहम्मद या दोघांनी कन्हैय्या लाल यांच्या दुकानात घुसून त्यांचा शिरच्छेद केला होता.
या हत्येशी संबंधित दोघाजणांना कालच ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत आणि भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन मुख्य आरोपींसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही लातेर यांनी सांगितले.