राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे ):राजगुरूनगर नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून नगर परिषदेसाठी १० प्रभागात ११ महिला आणि १० पुरुष असे २१ नगर सेवक असून नगर परिषदेवर महिलाराज येणार आहे. येत्या १३ तारखेला (सोमवारी) नगरसेवक(सदस्य) आरक्षण सोडत होणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, प्रतीक्षा निकुंभ यांनी दिली.
करोनाच्या संकटामुळे राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक तब्ब्ल २ वर्षे पुढे ढकलली आहे. जवळपास दीड वर्षे या नगर परिषदेवर प्रशासक राज आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांना मोठा खीळ बसला आहे. शहरातील पाणी योजना आणि भुयारी गटार या दोनीही योजनांची कामे अर्धवट राहिल्याने नागरिकांची मोठी गैर सोय होत आहे. इतर कामे ही खोळंबली असून नगर परिषदेत अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कामकाजवर मोठा परिणाम झाला आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता संपली असून प्रत्यक्ष निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेत नव्याने १० प्रभाग झाले आहेत. २१ सदस्य संख्या झाली आहे. त्याची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. जिल्हाधिकरी पुणे यांच्याकडे प्रभाग रचनेत ४ हरकतीवर सुनावणी झाली होती मात्र त्या सर्व हरकती अमान्य करण्यात आल्या.
राजगुरुनगर शहरात १० प्रभागात २८ हजार ५९२ लोकसंख्या असून त्याप्रमाणात १० प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये २९२३, प्रभाग क्रमांक २ मध्ये २५६२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये २७९९, प्रभाग क्रमांक ४ मध्ये २६०७, प्रभाग क्रमांक ५ मध्ये २५०२, प्रभाग क्रमांक ६ मध्ये २४६७, प्रभाग क्रमांक ७ मध्ये ४४१८, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ३०७७, प्रभाग क्रमांक ९ मध्ये २५३७ आणि प्रभाग क्रमांक १० मध्ये २७०० लोकसंख्या आहे त्यानुसार आरक्षण सोडत होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ७ मध्ये तीन सदस्य संख्या असणार आहे
राजगुरूनगर नगर परिषद स्थापन होऊन सात वर्षे झाली यात ५ वर्षे नगरसेवक तर २ वर्षे प्रशासक असा कालावधी गेला. आता नगर परिषदेच्या इतिहासातील दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी २०२० साली आरक्षण सोडत झाली होती. त्यानंतर करोना त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली. त्यावेलीचा आरक्षणातअनेक विद्यमान नगरसेवकांच्या संधी हुकल्या होत्या. मात्र आता पुन्हा त्यांचे भवितव्य येत्या १३ तारखेला आरक्षण सोडतमध्ये आजमावले जाणार आहे.