दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा व फिल्ममेकर विघ्नेश शिवन गुरुवारी विवाह बंधनात अडकले आहेत. महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. नयनतारा दाक्षिणात्य अभिनेत्री असली तरी देशभरामध्ये तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. तर विघ्नेश हा नावाजलेला दिग्दर्शक असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
बॉलिवूडचा किंग खान शहरुख याच्या आगामी जवान चित्रपटामध्ये नयनतारा लीड रोलमध्ये झळकणार आहे. जवानमधील आपल्या कोस्टारच्या लग्नाला शाहरुखने देखील आवर्जून हजेरी लावली होती. याखेरीज रजनीकांत, कार्ती, सरथ कुमार, ऍटली, विजय सेतुपती, मणिरत्नम हे दिग्गज देखील नवदाम्पत्यास शुभार्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.
विघ्नेश व नयनतारा यांनी तिरुपती मंदिरात लग्न करण्याचे ठरवले होते मात्र ऐनवेळी काही अडचणी आल्याने त्यांना लग्नाचे ठिकाण बदलावे लागले. लग्नसोहळ्याचे फोटो सार्वजनिक करण्यात येणार असून 11 जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश माध्यमांशी संवाद साधतील.
स्टार कपल नयनतारा आणि विघ्नेश 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नानुम राउडी धान या चित्रपटात एकत्र काम करताना ते एकमेकांच्या जवळ आले होते. विघ्नेशच्या चित्रपटासाठी नयनतारा लकी ठरली. या चित्रपटानंतर विघ्नेशने आपल्या करिअरमध्ये कधीही मागे वळून पाहिले नाही. 2016 मध्ये, या जोडप्याने एका पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नात्याची पुष्टी केली. आता 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते पती-पत्नी होणार आहेत.