नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेटमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. सौरव गांगुली यांनी बुधवारी (1 जून) ट्विट करून माहिती दिली आहे की, मी नवीन इनिंगला सुरुवात करू शकतो. मात्र, गांगुली यांनी याबाबत सविस्तर काहीही सांगितले नाही. लवकरच ते संपूर्ण जगाला याबद्दल सांगतील ,असं देखील त्यांनी लिहलं आहे.
या ट्विटनंतर माध्यमांत सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशा बातम्या आल्या होत्या. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे. सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही अशी माहिती जय शाह यांनी एएनआय या वृतसंस्थेला दिली आहे.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
— ANI (@ANI) June 1, 2022
सौरभ गांगुली यांनी काय म्हटलं होते ट्विटमध्ये….
सौरभ गांगुली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 1992 मध्ये माझा क्रिकेट प्रवास सुरू झाल्यापासून 2022 हे 30 वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जो या प्रवासाचा भाग झाला, मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली. आज, मी काहीतरी नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. मला वाटते की, ती योजना बऱ्याच लोकांना फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की मी माझ्या आयुष्याच्या या नव्या अध्यायात प्रवेश करत असताना तुमचा पाठिंबा कायम राहील.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
दरम्यान, सौरव गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. तर 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.