मानसिक आजारावर उपचार करणे होणार सोपे
कॅलिफोर्निया : आधुनिक जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या यंत्रमानवांच्या म्हणजेच रोबोटच्या साह्याने विविध प्रकारची कामे सहजपणे पार पाडली जातात. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे अतिशय छोट्या आकाराचा यंत्रमानव म्हणजेच मायक्रो रोबो मेंदूमध्ये सोडणे शक्य होणार असून त्या माध्यमातून काही मानसिक आजारावर उपचार करणेही सोपे होणार आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील बायोनाईट लॅब या संस्थेने या प्रकारचे संशोधन सुरू असून लवकरच या बाबतचे ताजे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. येत्या दोन वर्षांचा कालावधी मध्ये या यंत्रमानवाचा प्रयोग मानवावर करण्याची तयारी या संस्थेने सुरू केली आहे.
अतिशय छोट्या आकाराचे हे रोबोट म्हणजेच मायक्रोरोबो एखाद्या छोट्या गोळीच्या आकाराचे असून इंजेक्शनच्या सहाय्याने ते शरीरात सोडले जाणार आहेत नंतर चुंबकीय पद्धतीचा वापर करून हे रोबो मेंदूच्या दिशेने नेण्यात येणार आहेत.
या प्रयोगाची माहिती या लॅबचे संचालक मायकल शिकमेलबकेर यांनी दिली आहे. 1966 मध्ये आलेल्या एका चित्रपटात या प्रकारची संकल्पना राबवण्यात आली होती अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मायक्रोरोबोट च्या सहाय्याने मेंदुच्या गुंतागुंतीच्या आजारावर काही उपचार करणे शक्य होणार आहे. जर्मनीतील मॅक्स पलांक रिसर्च इन्स्टिट्यूट ही आघाडीची संस्थाही या संशोधनामध्ये सहभाग घेत आहे.