मुंबई – आज चलन बाजार बंद होताना रुपयाचा भाव नीचांकी पातळीवर असूनही पुन्हा दहा पैशाने कोसळून 77 रुपये 72 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक अनावश्यक कामासाठी डॉलर देणे कमी करण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत परदेशी पर्यटन कमी होणार आहे.
गेल्या दहा दिवसात रुपयाची ही पाचवी मोठी घसरण आहे. त्यामुळे आयात प्रचंड महाग पडत असून चालू खात्यावरील तुट वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान रुपयाची घसरण थांबण्यासाठी रिझर्व बॅंकेने बराच हस्तक्षेप केला.
त्यामुळे रुपयाची मोठी हानी टळली असे विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकेत झालेल्या व्याजदर वाढीमुळे रुपया घसरत असताना रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे रुपयाचे मूल्य वेगाने घसरत आहे. अशा परिस्थितीमध्ये युध्द लवकर संपुष्टात येण्याची गरज आहे. अन्यथा भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होऊ शकते असा गंभीर इशारा विश्लेषकांनी दिला आहे.