नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यापासून ओला, उबेरसारख्या प्रवाशांना टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्याविरुद्ध ग्राहकांनी बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीच्या आधारावर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.
या नोटिसा अयोग्य व्यवहार आणि ग्राहक हिताच्या भंगाबद्दल पाठविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपन्यांकडून या नोटिशीला 15 दिवसात उत्तर अपेक्षित आहे. प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, आमच्याकडे गेल्या एक वर्षापासून या कंपन्या विरोधात ग्राहकांच्या काही तक्रारी येत होत्या. या तक्रारी सेवेचा दर्जा आणि अयोग्य व्यवहारा संदर्भात आहेत.
प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ओला संदर्भात 2,482 तर उबेर संदर्भात 770 तक्रारी आल्या आहेत. ओला विरोधात झालेल्या तक्रारीतील 54 टक्के टक्के तक्रारी सेवेच्या दर्जा संदर्भात आहेत. तर उबेर संबंधात आलेल्या तक्रारीमध्ये 64 टक्के तक्रारी सेवेच्या दर्जासंबंधात आहेत. या संदर्भात या दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर 10 मे रोजी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चर्चा केली होती आणि सेवेचा दर्जा न सुधारल्यास कडक कारवाईची ताकीद दिली होती.
या बैठकीला ओला, उबेर शिवाय मेरू, रॅपिडो, जुगनू या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. ज्या तक्रारी आल्या आहेत त्यामध्ये अनेकदा या गाड्यांचे चालक ग्राहकांना नोंदणी कॅन्सल करण्यास भाग पाडण्याचा समावेश होता. अनेकदा ड्रायव्हर रोख पेमेंटचा आग्रह करतात. एकाच अंतरासाठी वेगवेगळे भाडे आकारले जाते. गाडीची नोंदणी करताना एसीचे आश्वासन दिले जाते. मात्र नंतर चालक एसी चालू करीत नाही. ग्राहकांनी कार कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारींच्या निवारणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे.