पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षित प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीत 139 नगरसेवकांसाठी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 22, तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव असणार आहेत. 25 प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा आरक्षित राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे.
महापालिकेच्या नगरसेवकसंख्येत वाढ झाल्यामुळे आगामी निवडणूक 139 जागांसाठी होणार आहे. तीन सदस्यांचे 45 आणि चार सदस्यांचा एक असे एकूण 46 प्रभाग अंतिम झाले आहेत. मात्र, प्रभागातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित जागा निश्चित केल्या जातात. ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असला, तरी सद्यस्थितीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षित जागा असणार आहेत. त्यापैकी महापालिकेत अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे.
अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 22 प्रभागात प्रत्येकी एक जागा राखीव राहणार आहे. 22 पैकी 11 जागा या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी तीन टक्के आरक्षण असून त्यांच्यासाठी तीन जागा राखीव असणार आहेत. त्यापैकी दोन महिला व पुरुष उमेदवार असेल. ही माहिती लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निवडणूक विभागाने जाहीर केली आहे.