नवी दिल्ली – व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणून परिचीत असलेले दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकतात. वास्तविक, येत्या महिन्यात होणाऱ्या दोन दौऱ्यांसाठी बीसीसीआय दोन वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणार आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कसोटी संघासह इंग्लंडला जायचे आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. अशा स्थितीत द्रविड कसोटी संघाचे प्रशिक्षक असेल. तर लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या युवा ब्रिगेडचे प्रशिक्षकपद सांभाळतील.
टीम इंडियाला येत्या दोन महिन्यात दोन महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. एक कसोटी इंग्लंडमध्ये आणि दुसरी टी20 मालिका भारतात खेळायची आहे. या दोन मालिकांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत या संघांसोबत स्वतंत्र कोचिंग स्टाफ असेल.
निवडकर्ते एका आठवड्यात टीम इंडियाची घोषणा करू शकतात. कसोटी संघात नियमित खेळाडूंची निवड केली जाईल, तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंना टी-20 संघात संधी मिळू शकते.