Year Ender 2023 : टीम इंडियाची क्रिकेटमधील यंदाची विशेष (Special Achievements) कामगिरी! जाणून घ्या, सविस्तरपणे…

Indian Cricket Team : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खूप चांगले गेले, जरी या वर्षी टीम इंडिया क्रिकेटच्या दोन सर्वात मोठ्या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर पराभूत झाली, आणि चॅम्पियन बनू शकली नाही, परंतु तरीही एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही देखील एक मोठी उपलब्धी मानली जाते. आज 31 डिसेंबर, म्हणजेच 2023 चा शेवटचा दिवस. भारतीय क्रिकेट महिला आणि पुरुष संघानी या वर्षातील सर्व सामने खेळले आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा शेवटचा सामना 30 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरूध्द खेळला गेला. या अतिशय रोमांचक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 3 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आणि हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने ही एकदिवसीय मालिकाही गमावली. या सामन्यासह भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 चा शेवटचा सामनाही खेळला.
टीम इंडियासाठी वर्ष 2023 ठरले चांगले…
भारतीय पुरुष संघाने यावर्षी ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करून सुरुवात केली. त्यानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आणि त्यानंतर वेस्ट इंडिज आणि आयर्लंडमध्ये चमकदार कामगिरी केली आणि त्यानंतर आशिया कपमध्ये चॅम्पियन बनले. चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही क्रिकेट संघांनी सुवर्णपदक जिंकून भारताची मान उंचावली.
त्यानंतर भारतीय पुरुष संघाने विश्वचषकातील सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकली. त्याचबरोबर महिला क्रिकेट संघानेही एकमेव कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून नवा इतिहास रचला. टीम इंडियाच्या(पुरूष आणि महिला) सर्व विशेष कामगिरीबदल क्रमाने जाणून घेऊया…..
पुरूष संघ –
1. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलग तिसरी कसोटी मालिका जिंकून पुरुष क्रिकेट संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला.
2. पुरुष क्रिकेट संघ 2021-23 ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उपविजेता ठरला.
3. पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेत आशिया कप 2023 चा चॅम्पियन बनला.
4. पुरुष क्रिकेट संघाने 2023 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले.
5. पुरुष क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विश्वचषकाचा उपविजेता ठरला.
6. पुरुष क्रिकेट संघाने घरच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
7. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुरुष क्रिकेट संघाने T20 मालिका अनिर्णित ठेवली आणि एकदिवसीय मालिका जिंकली.
महिला संघ –
1. महिला क्रिकेट संघाने चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.
2. महिला क्रिकेट संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एका कसोटी सामन्याच्या मालिकेत प्रथमच पराभूत केले.





