पुणे – महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेचे प्रभागनिहाय नकाशे अखेर महापालिकेने मंगळवारी दुपारी बदलांसह जाहीर केले. पालिकेच्या संकेतस्थळावर हे नकाशे उपलब्ध आहेत.
प्रभाग रचनेचे अंतिम नकाशे 17 मेपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, आयोगाच्याच आदेशानुसार महापालिकेने 13 मे रोजी रात्री उशिरा संपूर्ण शहराचा एकत्रित नकाशा आणि प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली. मात्र, प्रभागनिहाय नकाशे जाहीर केले नव्हते. अखेर हे नकाशे जाहीर झाल्याने 32 प्रभागांमध्ये नेमका कोणता बदल करण्यात आला, हे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर सलग तीन दिवस शासकीय सुट्टी होती. त्यामुळे दि. 17 मेची मुदत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने मंगळवारी दुपारी नकाशे जाहीर करत आयोगास ही माहिती कळविली आहे.
त्यामुळे आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्या तरी नगरसेवकांना प्रभाग रचना स्पष्ट झाल्याने आतापासूनच प्रचाराचा धुरळा उडणार आहे.