पुणे – माळीण दुर्घटनेनंतर दरडी कोसळण्याच्या घटनांची पूर्वसूचना सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) संस्थेतर्फे “सतर्क’ या उपक्रमातून देण्यात येत आहे. या उपक्रमाचे संशोधन “लॅंड’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे. ही सर्व यंत्रणा “सतर्क’ने नागरी सहभागातून उभारली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व अधिक आहे.
याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष आणि हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, “सीसीएस’ आणि टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे “सतर्क’ने संकलित माहितीच्या आधारावर संशोधन सादर केले. यात नागरिक, हवामान शास्त्रज्ञ आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी ही यंत्रणा उभारली.’ या शोधनिबंधात टेक्सास विद्यापीठातील डॉ. विनय कुमार आणि डॉ. कुलकर्णी या शास्त्रज्ञांसह मयुरेश प्रभुणे, स्नेहा कुलकर्णी, मिताली इनामदार, नितीन ताम्हणकर, स्पंदन वाघमारे, किरण ठोंबरे, परेश म्हेत्रे, तनुजा खटावकर, यशोधन पानसे, अमेय पटवर्धन, योगिनी सोमण, प्रसाद भगत, सुमित भाले आदी “सिटीझन सायंटिस्ट’चा सहभाग आहे.
संशोधनातील प्रमुख नोंदी
औरंगाबादमधील डोंगराळ भागातही दरडी कोसळण्याची भीती
डोंगराळ व माती असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता
किती पाऊस पडल्यानंतर दरड कोसळण्याची शक्यता असते याचा विभागनिहाय अभ्यास
पाऊस आणि भूरचनेचा अभ्यास करून दरडी कोसळण्याचा अंदाज
त्यापैकी 76 टक्के अंदाज बरोबर आले असून या विश्लेषणाचा या शोधनिबंधात समावेश
देशातील पहिलाच उपक्रम
“सतर्क’तर्फे तीन स्तरांची दरडींची पूर्वसूचना देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम आहे. हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येणारा अंदाज, रडारवरच्या नोंदी, उपग्रहीय छायाचित्र या आधारावर दरड कोसळण्याची पूर्वसूचना “सतर्क’तर्फे देण्यात येते. त्यासाठी राज्यातील दरड कोसळण्याच्या घटनांचा नकाशाही संशोधनातून तयार केला आहे, असे डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.