पुणे- लक्ष्मी रस्त्यावरील एच.एच.सी.पी. हायस्कूल, हुजूरपागा शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी उन्हाळी सुट्टीची सुरूवातच “बॅटरीवर चालणारी सायकल’ या नवोपक्रमाने केली.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, हुजूरपागा लक्ष्मी रोड हायस्कूलच्या मुख्याध्यापक रंजना वाठोरे यांनीही या उपक्रमास अनमोल मार्गदर्शन केले. यासाठी विद्यार्थिनींना लर्निंग लिंक फाऊंडेशनचे वेदांत जोशी यांचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभले. इयत्ता नववीच्या एकूण सहा विद्यार्थिनींना घेऊन हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी प्रशालेतील विज्ञान शिक्षक मनीषा नहार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. लर्निंग लिंक इंडिया फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या “स्टेम शक्ती’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी ज्या ज्या शाळांना टिनकरिंग लॅब उभारून दिली आहे. त्या शाळांना त्यांनी उन्हाळी सुट्टीत एक प्रकल्प करण्यास सांगितला होता. शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाची ओळख व्हावी व त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध असावा या उद्देशाने बॅटरीवर चालणारी सायकल बनविण्याचा संकल्प करण्यात आला व त्याची अंमलबजावणीही झाली.
या प्रकल्पाचे काम 25 एप्रिल ते 5 मे या कालावधीत पूर्ण करण्यात आले. यात सुहानी रुपेश चव्हाण, गौरी संतोष शिंदे, तृप्ती दशरथ शेलार, तनुश्री राजेश राणा, वसुंधरा राजेंद्र कचरे, संस्कृती सतीश रेणुसे हा विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनी बऱ्याच बाबी शिकल्या. सायकलचे चाक कसे काढावे, त्यात मोटार मधल्या रिंगच्या एक्सेलवर कशी फीट करावी, बॅटरीची जोडणी वायरसोबत कशी करावी तसेच हॅन्डलला बसविलेला हेड लॅंप बॅटरीसोबत कसा जोडावा, वायरचे सोल्ड्रिंग कसे करावे या सर्वच बाबींचे प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थिनींनी मिळाले.