मुंबई – मुंबईत एनसीबीने धडक कारवाई करत एक ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. एनसीबीने सलगत दोन दिवस विविध ठिकाणी छापा टाकून 445 ग्रॅम गांजा, कोकेन आणि 2 लाख 96 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.
मुंबईच्या परदेशी पोस्ट ऑफिसमध्ये कारवाई करत 225 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त करण्यात आला. हे पार्सल कॅनडातून इनबाउंड होते. याप्रकरणाचा सखोल तपास केला असता एनसीबी मुंबईच्या पथकाने 7 मे रोजी रात्री उशिरा मालाड येथे रिसीव्हरच्या घरावर छापा टाकून 220 ग्रॅम हायड्रोपोनिक विडसह 2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुसऱ्या कारवाईत एनसीबीने मिरा रोड पूर्व येथे अल्प प्रमाणात कोकेन जप्त करत एकाला अटक केली. घटनास्थळी चौकशीच्या आधारे एनसीबी, बेंगळुरूच्या पथकाने बंगळुरू येथे रिसीव्हरसाठी सापळा रचला. या कारवाईत अल्प प्रमाणात कोकेनसह एका आफ्रिकन पुरुषाला पकडण्यात एनसीबीच्या पथकाला यश आले आहे. एनसीबी मुंबईने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकाने कारवाई केली.