पुणे –पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. मुळशीतील भुकुम, भुगाव, पिरंगुट, हिंजवडीपाठोपाठ आता घोटावडे येथील अनधिकृत बांधकांमावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे. घोटावडे येथील अनधिकृतपणे बांधलेले 18 हजार 210 स्केअर फूट क्षेत्रातील तब्बल 45 गाळे कारवाई करून पाडण्यात आले.
घोटावडे येथील तीन ठिकाणी अनधिकृत दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले होते. हे सर्व गाळे पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आले. अशा प्रकारच्या पत्र्याच्या शेडच्या बांधकामाचा सुळसुळाट झालेला असून सर्वच जागी अशी बांधकामे पाडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईवेळी पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्राधिकरणाने यापूर्वी वाघोली, शिरूर (कारेगाव), कुंजीरवाडी, कुरुळी (ता.खेड),मांजरी आणि सोरतापवाडी या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे, असे उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.